मराठी मायबोली
मराठी मायबोली
किती लाघवी प्रेमळ
मुखी वाटते मधाळ
मायबोली ही मराठी
भाषा सुगंधी रसाळ..
जोडी नाते विश्वासाचे
बंध स्नेह माणुसकी
शब्द नमस्कार मुखी
वाटे प्रेम आपुलकी..
हळू शिरकाव करी
जागा हृदयी घेईल
गोड भाषा अलवार
गावी मायेच्या नेईल .
कथा कादंबरी काव्य
श्राव्य वाटते मधुर
ज्ञान साहित्य भांडार
रस ग्रहणा आतुर..
ओवी अभंग कीर्तन
अमृतमयी ज्ञानेश्वरी
जीवनाची मोक्ष वाट
मंत्र राम कृष्ण हरी..
