मनविच्छेदन
मनविच्छेदन
रात्रीच्या अंधारात,
थिजलेल्या देहाने;
ती लिहिते आत्मचरित्र,
भिजलेल्या डोळ्यांनी!
घुबडांचा घुत्कार तिच्या,
पानापानावर घुमतो!
रातकिड्याची किरकिर,
ओळी ओळीत किरकिरतो
सनईचा सूर पानावर,
उमटलाही होता....
मोगऱ्याचा सडा कधी,
दरवळलाही होता...!
दिवाळीचे दिवे झगमगले,
नाहीच असे नाही,
अंतरीतला आगडोंब,
मात्र... त्याहूनी प्रखर होता
अशांततेची मशाल कायम
...भडकतच राहिली उरात!
दुःखाची काळी किनार,
वाढतच राहिली मनात...!
श्वापदे सारी... शहरभर,
मोकाट सुटली आहेत
अजगरे चोहुकडे....
आ वासुनी बसली आहेत!
भेकड स्वाभिमानाचा चंद्र,
पोरका धाडसावीण;
लपून बसतो सदा येथल्या,
संस्कृतीच्या ढगाआड...!
काय करू... लिहून म्हणते,
आत्म्याचे कथन....
पुन्हा एकदा चिरफाड नव्याने,
होईल पुन्हा मनविच्छेदन...!!!