मनभावन
मनभावन
रिमझिमती
श्रावणात सरी
आल्या धरेवरी
मंद ती गती ... १
पाऊस ऊन
यांचा खेळ चाले
आनंदात न्हाले
आगळी धून ... २
गगनी झुले
इंद्रधनू झुला
घरात तान्हुला
झोक्यात डुले ... ३
सय मायेची
श्रावणात खास
स्वप्नातही भास
वाट हाकेची ... ४
दारात काक
सारखा ओरडे
देवास साकडे
मायेची हाक ... ५
शालू हिरवा
धरित्री नेसली
नटली सजली
ऋतू बरवा ... ६