मनातला पाऊस
मनातला पाऊस
बेफाम होऊन कोसळतो कधीही
हौस भागवून घेतो मनसोक्त
रिमझिम बरसतो नाचतो थुईथुई
तुझा माझा आवडता पाऊस
आठवण त्याची सरत ही नाही अन
पुरत ही नाही रात्रंदिनी ,शामप्रहरी
आपल्या प्रेमाचा जिवंत साक्षीदार
आठवत राहतो मनातला पाऊस
पाऊस येतो जातो आपल्याच मर्जीने
धो धो बरसून जातो वादळाशी सलगी
करून नाचतो जेंव्हां छाताडावर आमच्या
विध्वंसाची खापर नाहक स्वतःवर घेतो
पाऊस जागवतो आठवणी जुन्या
ताज्या होत फेर धरून नाचू लागतात
लहानग्या मुलागत वाकोल्या दाखवून
उंच ढगात गायब होतो मनातला पाऊस
पाऊस असतो मनाची दरवळ
सुखाची हिरवळ पेरून जातो
वाट्टेल तेंव्हा येतो पाऊस
आतुर असते मन तरीही
पाऊस असतो लहरी कलंदर
कधी होतो बेहद्द बिलंदर
तो असतो सृजनाचे प्रतीक
आठवत राहतो मनातला पाऊस
