मला भावलेली ती
मला भावलेली ती
खूप दिवसांनी जेव्हा
तिचे संवाद पडले कानी,
मन माझं हरवून गेलं
कुठल्या कुठे तत्क्षणी !!
किती दिवस मी तिची
पाहिली होती वाट,
कारण तिने न सांगताच
धरली होती दुसरी वहिवाट !!
खूप बरं वाटलं मला
तिचा आवाज ऐकून आज,
असं वाटत होतं की
प्रेमाला पुन्हा चढतोय नवा साज !!
विचारावं नाही वाटलं तिला
का बरं गेली अशी सोडून,
काय केला होता मी गुन्हा
जी गेलीस माझं हृदय तोडून !!
समजलं शब्द बाहेर पडताच
तिच्या त्या सुंदर मुखातून,
काय तिने सोसलं अन्
किती गेली ती दुःखातून !!
वडिलांनी जबरदस्तीने
तिचा दिला लावून विवाह,
अन् आमच्या प्रेमळ स्वप्नांना
करून टाकलं क्षणात स्वाह !!
तरीदेखील ती म्हणे
मी तुझ्यावरच प्रेम करते,
अन तुझ्याशिवाय मी आता
जगते किंवा मरते !!
असा पाहून प्रसंग बाका
अंगावर येऊ लागले काटे,
अन मनात माझ्या पुन्हा
नवं वादळ येऊन दाटे !!
म्हंटल तिला मग मी
आता विचार माझा सोडून दे,
लग्न झालं ना तुझं
आता नवऱ्याशी तू जोडून घे !!
मी नाही म्हणताच राव
तीन कापून घेतल्या नसा,
अन रक्त पाहून तिच्या हातचं
कोरडा पडला ना माझा घसा !!
झपकन उघडले डोळे
बसलो अंथरुणात उठून,
काय सांगू राजे हो
या स्वप्नांमुळं चष्मा गेला ना फुटून !!

