मिठी प्रेमाची
मिठी प्रेमाची
मिठी ती मंतरलेली
कधी पडते गळ्यात
प्रश्न हाच उभा राही
सदा सर्वदा मनात ।।१।।
मन माझे आसुसले
प्रेमयुक्त मिठी साठी
कधी घडेल कळेना
पुन्हा त्याच भेटीगाठी ।।२।।
शुभ्र शीतल चांदणे
तुझ्या कुशीत भेटते
हळुवार स्पर्शा मुळे
ज्योत प्रेमाची पेटते ।।३।।
हात रांगडा मायेचा
पाठी वरून फिरावा
शीणभाग संसाराचा
एका क्षणात जिरावा ।।४।।
काय वर्णू आई तुझ्या
गोड मिठीची किमया
ओटी सुखाने भरते
दुःख पळते लीलया ।।५।।
