मी... तू...
मी... तू...
तू असावीस जवळ
असं आतून येत काहीतरी
तुझ्या लक्ष नक्षत्रांच्या माळा
गात असतात, एक अनाहूत गाणं
मी धुंद होत जातो...
तुझ्या मोकळ्या केसांतून झिरपणाऱ्या गंधाने !
त्यातून अलगद फिरवत बोटे
तुझ्या केसातून छेडत जावासा
वाटतो एक अनुराग !
टिपून घ्यावासा वाटतो ओठांनी तो
तुझ्या सजल कुंतलातून निथळत
तुझ्या पाठीवर थांबण्यास आसुसलेला जलथेंब!
तुला गच्च मिठीत बांधतांना
तनुभर विहरत जातं वीजगाणं !
तुझ्या प्रत्येक डहाळीवर
अलगद उतरतात,माझ्या ओठांचे पक्षी...
विसावतात...
तू वसंतवेल होऊन बहरत येतेस
माझ्या पिटुकल्या अंगणात!
तेव्हापासून एक कोकीळ जो गातो आहे, तो आजतागायत!
