मी मुलगी आहे***
मी मुलगी आहे***
आई बाबा मी मुलगी आहे
गर्भात मला राहू द्याल,
किती सुंदर दुनिया आहे
थोडीशी मला पाहू द्याल.
माता भिमाई, रमाई,जिजाऊ,सावित्री
यांच्या सारखे मोठे मोठे कार्य मी करेन,
स्त्रीवर अन्याय अत्याचार
करणाऱ्याला पुरून मी उरेन.
सांगा आई बाबा तुम्ही हे कार्य करू द्याल,
किती सुंदर दुनिया आहे
थोडीशी मला पाहू द्याल.
दादाला पंचपकवाण द्या
रात्रीची शीळीच भाकरी खाईन मी,
तुमच्यावर ओझं कधीच होणार नाही
याची आज ग्वाही पण देते मी.
सांगा आई बाबा शिळी भाकरी खाऊ द्याल.
किती सुंदर दुनिया आहे
थोडीशी मला पाहू द्याल.
तुमचा तुपाचा दिवा दूर सारेल
पण,ही तेलाची पणती सारणार नाही,
येऊद्या कितीही संकटे वाट्याला
मरेपर्यंत एकटं तुम्हाला सोडणार नाही.
सांगा आई बाबा तेलाची पणती होऊ द्याल,
किती सुंदर दुनिया आहे
थोडीशी मला पाहू द्याल.
खूप छोटं आहे माझं स्वप्न
कधी करणार नाही कशाचा हट्ट,
घेऊद्या ना जन्म तुमच्या पोटी
हाती पडेल ते मी करेल कष्ट.
सांगा आई बाबा जन्म तुमच्या पोटी घेऊ द्याल,
किती सुंदर दुनिया आहे
थोडीशी मला पाहू द्याल.
