रडत बसू नका...
रडत बसू नका...
काळजातली आग विझवून
कायम हसत रहा,
मला अग्नी देतांना
एकदा डोळे भरून पहा.
हुंदके मारत डोके
आदळू नका डोक्यावर,
रडत बसू नका तुम्ही मी मेल्यावर...
आईचं दूध करपलं
बापाची तुटली काठी,
मरणाने माझ्या झाल्या
सर्वांच्या गाठी भेटी.
लाकडावर लाकडं
रचू लागले कसे सरणावर,
रडत बसू नका तुम्ही मी मेल्यावर...
भावाचा आधार तुटला
बहिणीची माया संपली,
मुलगा पोरका झाला
बायको आक्रोश करू लागली.
माझा विषय सोडा आता
जीव लावा एकमेकांवर,
रडत बसू नका तुम्ही मी मेल्यावर...
मित्र मंडळी जवळ येऊ लागले
मला पाहून अश्रू ढाळू लागले,
बरा-वाईट होता म्हणे
आपसात चर्चा करू लागले.
माझ्यातला चांगुलपणा
ठेवा छापून मनावर
रडत बसू नका तुम्ही मी मेल्यावर...
