मी कशी? मी अशी!!
मी कशी? मी अशी!!
मी कशी ? मी अशी !!
मी अशी, मी तशी;
सांग, माझ्या मना मी खरी कशी?
खरंच आहे का मी वत्सल, प्रेमळ?
आहे खरंच का मी शांत, सोज्वळ?
जगाला दाखवण्याचे हे रूप का माझे?
आणि अंतरंगात एक वेगळेच प्रतिबिंब तुझे?
मना, मी खरीच का प्रियदर्शी?
सांग माझ्या मना मी खरी कशी? ॥
मना, कधी वागते मी अवखळ।
कधी देते मी इतरांनाही बळ।
कधी सुचती मज भन्नाट कल्पना।
कधी विचारात भरकटते नाना।
कधी भासे मज, मी सोने बावनकशी।
सांग माझ्या मना , मी खरी कशी॥
गवसत नाही माझेच मन मला।
ओळखण्याची नच अवगत कला।
नाही तपस्वी, नच साधक मी।
कशी रेखाटू प्रतिमा माझी मी?।
चित्रकार मी नच भावस्पर्शी।
सांग माझ्या मना मी खरी कशी ॥
एक सांगते गुपित तुला मी।
भाव जपले जे अंतरात मी।
अव्यक्ताशी जोडले जरी नाते।
माझीच मजला " मी " आवडते।
मी अशीच रे मर्मस्पर्शी।
राहू दे मला नेहमीच अशी॥
राहू दे मला नेहमीच अशी॥
