मी आणि तू..
मी आणि तू..
तू गीत मी साज
मी शब्द तू अर्थ
तुझ्याशिवाय माझे असणे
निव्वळ व्यर्थ..
मी निःशब्द.. मी मौन
तू स्पर्शाची भाषा..
कधी मी निराश मन
सदैव तू पल्लवित आशा...
मी असह्य दुरावा
तू सुखद जवळीक..
मी अनामिक हुरहूर
तू शांत विसावा...
मी रात्रीचा निशिगंध
तू पहाटेचा पारिजात..
मी वैशाखातली तप्त रणरण
तू मृगाच्या पावसाची पहिली सर...
मी वारा जरा संथ
तू पावसानंतर दरवळणारा मृद् गंध...
मी मध्यरात्रीचा काळोख
तू उत्तरेचा ध्रुवतारा...
मी थांबलेला क्षण
तू सुंदर उद्याची चाहूल..
कधी मी सरलेला काळ
तर तू भविष्याकडे
पुढे टाकलेलं एक पाऊल..
©®निशा काळे.
