महत्वाकांक्षी
महत्वाकांक्षी
सूर्य उगवला आणि तो पहाटेच उठला,
हातात मशाल घेऊन जग जिंकायला निघाला.
चालता चालता थकला, तहानला ,भुकेने व्याकुळ झाला,
पण जग जिंकण्यासाठी तो नाही थांबला.
हातात मशाल घेऊन रेल्वेच्या इंजिनामध्ये शिरला,
हाताच्या पंजाने इंजिन धावण्यासाठी इशारा करू लागला.
तो थांबायचा घड्याळ बघायचा पुन्हा उठायचा.
पण पुन्हा तुतारी वाजून पुढे जायचा.
किती संघर्ष, किती तो प्रवास पण तो नाही थांबला,
तो चालत होता , धावत होता , पळत होता , रेंगाळत होता.
जग जिंकायच्या आशेने त्याची रेल्वे एका ठिकाणी थांबली,
पुढे असलेल्या संघर्षाला तोंड देण्यासाठी,
त्याने मशाल सोडून धनुष्यबाण हातात घेतला.
आणि तो जग जिंकण्यासाठी तो पुन्हा निघाला.
आता प्रवास खुप कणखर झाला खुप कठीण झाला,
घड्याळ बघुन चिखलातील कमळाप्रमाणे तो फुलला.
जग जिंकायच्या नादी जगच जाळायला निघाला,
घामाच्या रक्ताने जमिनीतून सोन पिकवणारा त्याला दिसेना.
रक्ताचा घाण करून जगणाऱ्या श्रमिकांना हा पुसेना,
भाषेवर, जातीवर, धर्मावर पाय देऊन तो चालला.
स्वतःच्याच रक्ताने स्वतःचे रक्त पुसायला निघाला.
अनोखळी बापासाठी विश्व जाळायला चालला.
खरंच तो डोळे बंद करून जग जिंकायला निघाला.
