महाराष्ट्र गीत
महाराष्ट्र गीत


सळसळती हे रक्त आमुचे
तळपती छत्रपतींच्या तलवारी
समृद्ध सुखी देशासाठी संविधान
बाबासाहेबांची लेखणी जगात भारी
भाग्य माझे येथे जन्मलो
जेथे मुखी नांदते मराठी
तिचा गोडवा काय वर्णू मी
अमृताहूनी गोड लागे मराठी
नथ शोभे सुंदर नाकावरती
उठून दिसे त्यावरी पैठणी नव्वारी
फेटा अन् गांधी टोपी डोक्यावरती
स्वाभिमानी मन रांगडेपणा तरी
कधीही न झुकला छावा शिवबाचा
दिल्लीचे तख्त राखिले गनिमास हरवूनी
सिंहाचे दात मोजतो निधडी छाती
स्वराज्य वाढविले पराक्रम गाजवूनी
इथेच झाली सिंहगर्जना भारतमातेसाठी
मराठी रक्ताने घेतली उडी स्वातंत्र्यासाठी
इथेच केली आम्ही शिक्षणक्रांती
बीज पेरले झाली चित्रपटक्रांती
किती वर्णू या सह्याद्रीच्या कथा
गानकोकीळेच्या सुरांपुढे नतमस्तक माथा
तलावारीसारखी बॅट तळपली होती
कृष्ठरोग्यांची सेवा येथेच घडली होती
महाराजांनी जपली वाढविली कुस्ती
संकट येता आस्मानी पेटूनी उठे वस्ती
प्रेम शिकवण्या दिली जगा श्यामची आई
अवतरली कवितेतूनी सरस्वती बहिणाबाई
कुशीतली ऊब लाभली सदैव
जिजामाता, अहिल्याबाई अन् रमाई
ज्ञानाचा प्रकाश दाखवी मुक्ताई
अ, अा, ई शिकविण्या आल्या सावित्रीबाई
सारे येथेच घडले किती पु़ण्याई
आशीर्वाद देण्या उभी विठाबाई
पावन करते मज चंद्रभागामाई
अजून येथे राबते पिल्लांसाठी आई