मेनोपॉज
मेनोपॉज
आजकाल काय होत
माझे मला कळत नाही
स्वतःच्याच शरीराचे
गणित मला समजत नाही
उगा नुस्ता त्रागा करते
कारण नसतांना चिडचिड करते
वेळा पाळूनही पूर्वी सारखे
काम होत नाही
आजकाल काय होत.......
दोन शब्द गोड बोलायला
कुणाकडे वेळ नाही.
तरी रक्तातील साखर
कमी काही होत नाही.
बी. पी. च्या गोळ्या घेऊन
बी.पी.खाली काही येत नाही
आजकाल काय होत......
रात्री रोज विचार करते
सकाळी वॉकला जावे
निसर्गाच्या सान्निध्यात
स्वतःला शोधावे
पण... सकाळी जाग येऊनही
जागेवरून उठवत नाही
आजकाल काय होत......
महिन्याच्या तारखा सतत
मागे पुढे होत राहतात.
कधी कधी दोन दोन महिने
गैरहजर त्या असतात
माझ्या शरीरातले मला काही उमजत नाही
आजकाल काय होत......
डाॅक्टरी भाषेत याला म्हणे
प्री- मेनोपॉज म्हणतात
पन्नाशी जवळ आली की
म्हणे असे बदल होत असतात.
ही शरीराची सांकेतिक भाषा
मला काही वळत नाही
आजकाल काय होत......
एसी, कुलर सुरू असून
घामाने ओली चिम्ब होते.
वाळवंटात जणू मी एकटीच
धावत असते.
हिवाळ्यात सारे रजई घेऊन निजतात
तेव्हा थंड शॉवर मला घ्यावासा वाटतो.
नशीब, घरातले मला वेड्यात काढ़त नाही.
आजकाल काय होत.......
तारुण्यात पदार्पण करतांना
हसत स्वागत केले *ती* चे
आता जाताना का बरे असे
रडवलेले चेहरें दिसे
माहेरवाशीण आहे *ती*
माहेर तीला सोडवत नाही
आजकाल काय होत
माझे मला कळत नाही
स्वतःच्याच शरीराचे
गणित मला समजत नाही.
