धन्यवाद कविते*
धन्यवाद कविते*
*धन्यवाद कविते*
कधी कधी विचार येतो मनात,
की कवितेचा हात जर हाती धरला नसता,
तर आयुष्याची घुसमट
अशी सोसता आली नसती.
शब्दांच्या सावल्या जर अशा आभाळागत गावल्या नसत्या,तर दुःखाच्या वणव्याची दाहकता अशी पायदळी तुडवता आली नसती.
शब्दांचे बिल्लोरी कंगन
जर असे
सतत मनात,कानात खणखणत राहिले नसते,
तर शुक्राची चांदणी अशी,
काव्यात गाता आली नसती.
विरहाच्या घनदाट अरंण्यात
सानत्वनेचे शब्द काजव्यांसम चमकले नसते
तर,
आयुष्याच्या दुःखांना कस्तुरीची
सर करता आली नसती.
सूर्याला विवंचनेचे अर्द्य देऊन त्याला सहनशीलतेची कवच कुंडले मागता आली नसती
तर
कर्णाच्या दानाच्या गाथे ने इतिहासाचे पान अन् पान असे हळहळले नसते.
मोत्याच्या शब्दांनी जर
सुवर्ण शब्दांना आज असा
साज चढवत धन्यवाद देता
आले नसते
तर,
माय झालेल्या माझ्या कवितेच्या पदराखाली मी आजन्म अशी सुखवली नसती.
मंदा खंडारे
