झोळी होऊ दिली नाही
झोळी होऊ दिली नाही
दुःखांना डोहीवरची तिने
मोळी होऊ दिली नाही.
स्वप्नांनांची कधीही तिने
होळी होऊ दिली नाही
कुठले भोग भोगायचे
राहून गेले तिचे सांग ना.
आयुष्या तुझ्या कोंडीची तिने,
आरोळी होऊ दिली नाही.
हृदयी व्याकुळ व्यथांचे
ती गीत गात राहली.
जीवना तुझी कधीही तिने
चारोळी होऊ दिली नाही.
भाळावरच्या टिकलीचेही
इथे बघ राजकारण होते
पण अस्तित्वाची तिने कधी
खांडोळी होऊ दिली नाही.
दिला संविधानाने तिला
जगण्याचा अधिकार इथे.
फाटकाच सही पदर, तिने,
त्याची झोळी होऊ दिली नाही.
मंदा खंडारे
