मैत्री... मन
मैत्री... मन
मैत्री म्हणजे मैत्री... मैत्री म्हणजे विश्वास... मैत्री हवी जीवा-शिवाची... कृष्ण-सुदाम्याची... रक्ताच्या नात्यापलीकडले नाते म्हणजे मैत्री. मैत्रीचा प्राण आहे विश्वास... गैरसमज नि अविश्वास हे मैत्रीचे खरे शत्रू... मैत्रीत व्यवहारिकता अजिबात नको... उपकार, स्वार्थ, नफा, तोटा, हिशोब तर अजिबातच नको... मैत्री ही नि:स्वार्थच असते नि नि:स्वार्थच हवी... मैत्री म्हणजे आत्म्यांचं नातं... मैत्री ही उघड्या डोळ्यांनी नाही तर डोळे झाकून असावी... मैत्री हा धर्म हवा... मैत्रीत ना उपकार, ना आभार, ना धन्यवाद... खरीखुरी आत्मीयताच मैत्रीत हवी. गरज सरो नि वैद्य मरो ही मैत्री नव्हे. शहाण्याने जीवाला जीव देणारे मित्र जोडावे असे म्हणतात... असा मित्र ज्याला लाभला तो भाग्यवानच... मैत्री जीवन घडवू, बिघडवू शकते...?? नव्हे घडवूच शकते.. मैत्री एक नाजूक बंधन आहे... त्याला खूप खूपच जपावं लागतं... जी जपली जाते ती मैत्री... जी टिकली, टिकवली जाते ती मैत्री... जी अबाधित राहते ती मैत्री... जी तुटतच नाही ती मैत्री... खरी मैत्री बंधुत्व जोपासते. भावाभावात नसेल तेवढं प्रेम, विश्वास मैत्रीत असतो... बस्स अजून काय असावं? मैत्री ही मैत्रीच असते. मैत्री टिकवावी नाही टिकावी लागते. मैत्री लाभावी लागते. आईनस्टाईनला मुलाखतीत प्रसारमाध्यमांनी विचारलं तू एवढा मोठा, तुला अजून काय हवं? तुला काय मिळालं नाही? त्यावेळी तो म्हणतो मला दोस्ती करता आली नाही... मला खरा दोस्त भेटला नाही... पुढच्या जन्मी मी खरी दोस्ती करेन, चांगला दोस्त बनवेल...
खऱ्या दोस्तीला सलाम, प्रणाम..!!!!
-----
खरंच मन वेडं असतं किती समजवावं त्याला
काय कुणाच्या मनात असते नाही कळत कुणाला
कुणा ना कळले कसा घालावा मनास या आवर
सापडले न मर्म मनाचे, चंचल मन हे फार
कळले का कुणास कधी भेद खरे या मनाचे?
विचारा तुम्ही मनास तुमच्या सारे कळतील रंग त्याचे
मनात एक अन् जनात एक हा डाव मनाचा न्यारा
मनमानी ही चाले मनाचीच मोठा मनाचा पसारा
मन माझे हे मला न कळले, कळले नाही कुणाला
मनात चाले गुंता मनाचा ठाऊक तेही मनाला
मन कुठे, कधी नि कसे, काय ते सारेच मन जाणे
मनालाच ठाऊक कुणाची कधी जुळतील कशी मने
शोधून तरी ते सापडेल का मन मनात नसताना
मुळीच नसतो भरोसा मनाचा मी रडतोय हसताना...
