मायेचा पदर
मायेचा पदर
तुझ्या मायेचा पदर
त्याला रेशमी किनार
उभा मनात तुझ्या ग
स्वप्नांचा चारमिनार
किती जपतेस नाती
कसे सोसतेस घाव
इच्छा आकांक्षांचा नाही
कुणालाही तुझ्या ठाव
उभा राहतेस पुन्हा
धडपड जगण्याची
किती करु स्तुती तुझ्या
या भाबड्या वागण्याची
पुन्हा होतेस तरुण
बालमन जपायला
लपंडावाच्या खेळात
दाराआड लपायला
घ्यावास शोध मनाचा
द्यावी भरारी पंखांना
करावी वाट मोकळी
उमलू दे भावनांना