माती
माती
बीज रुजते स्वप्न सजते
मातीच्या गर्भात
डोळे उघडून रोप
पाहते सोनेरी पहाट
आभाळाचे दान झेलते,
हिरवाईचा वंश पोसते
धरणीचा पदर माती
चैतन्याचा वर्ख पांघरते चराचराचा आधार माती
सूर्य देतो तेज आपले
माती देते सार
पानाफुलांनी फळांनी बहरतात वृक्ष मग डेरेदार
पक्षी बांधती घरटे घेऊनी फांदीचा मग आधार
सावली देई पांथस्थाना, पक्षी त्यावर करी संसार
माती सुखावते पाहून बीजाचा चमत्कार...
कसे फेडावे या मातीचे ऋण...? जन्माला आल्यापासून मरेपर्यंत
पोटाची खळगी भरण्यासाठी बनते जी आधार
पिढ्या पिढ्यांची नाळ जोडते नवरत्नांची खाण माती
गढी बनूनी उभी ठाकते
गाव कुसाची शान माती
या मातीचा रंग निळा
निराळाच गंध
रंगारंगामध्ये वेगळा
भासतो एक भावबंध
सीमेवरती निर्भय करते सैनिकाची शपथ माती
दारिद्रयाचे वण्र झाकते झोपडीचे लिंपण माती
जिंकायला कोणी येता
अजिंक्य ही ठरते
लाख सिकंदर आक्रमकांना पुरून ही उरते
सूर्य कुणाच्या साम्राज्यावर कधी न मावळला तो मावळल्या या मातीवर गर्व गळुनी सगळा
माती असे देशाची आण बाण शान
ज्या मातीवर आज उभे आपण ताठ ठेवून मान
स्वतंत्रतेचा इतिहास असलेल्या
या मातीचा असावा सर्वांना अभिमान
