लाटखुळी रंगरात्र
लाटखुळी रंगरात्र
कुठेतरी तिठ्यावरी सहज भेट झालेली
पारदर्शी डोळियांत वेदनाच देखियली
ओळखही नसताना का उरात येत कळा?
देठांतून कोंभफुटी खळबळला पानमळा
थरथरत्या ओठांतून बोल फुटे अलगदसा
भारावून जागविला मंत्र तोच लवचिकसा
***
भेट पुन्हा ती तशीच लाजवंती नजर जरी
किणकिणत्या काकणांत नादलुब्ध सोनपरी
अनामशा ओढीने अंतराय सरलेला
धुसरता संधिकाल श्वासांतून विरघळला
बंधनांत अनिर्बंध सळसळले गात्रगात्र
समुद्रात धसमुसळी लाटखुळी रंगरात्र