इतके बळ शिल्लक आहे
इतके बळ शिल्लक आहे
आधाराला काठी घ्यावी इतका अजून थकलो नाही
सारी नाती जोपासताना खरेच कधी चुकलो नाही
पराजयाने खचलो नाही, विजयात हरखून गेलो नाही
आपत्काली जळते निखार झेलत असता हटलो नाही
उतलो नाही, मातलो नाही, घेतला वसा टाकला नाही
माथ्यावरच्या छपराखाली खांदे पाडून बसलो नाही
मार्गी काटे रुतूनसुद्धा पाय मागे फिरले नाहीत
कंटकांच्या झोळीमध्ये शिव्याशाप ओतले नाहीत
अडवणारे हात येतात त्यांशी दोन हात करतो
आसू पुसून हसू पेरीत विदूषकच होऊन जातो
नासू लागले सारेच तर सोयरसुतक धरत नाही
विभोर चंद्र चुम्बताना ध्यास विकत बसत नाही
क्षितिज लंघून जाण्याची जिद्द अजून बाकी आहे
निळाईच्या अथांग डोहात डुंबायाची ओढ आहे
सागराची नभस्वप्ने उरात घर करून आहेत
मातीचीही ध्यासबीजे रोमरंध्री रुजून आहेत
सृष्टीगान ऐकतऐकत भूपाळीचे सूर लावतो
तिच्याच मनःशांतीसाठी अभंगसे गीत गातो
वय जरी झाले तरी मन अजून ताजे आहे
गर खाऊन बिया फोडतो इतके बळ शिल्लक आहे
