कृतज्ञता
कृतज्ञता

1 min

1.7K
कातळ दगडाला दिला
किती घासून आकार
दगडाचा देव केेेेला
त्या गुरुचे उपकार
ज्यांनी शिकवला होता
सद्गुण सदाचार
मानू कसे गुरुदेवा
तुझे आभार आभार
सार्थ सुफळ जाहली
जन्मोजन्माची पुण्याई
गुरु तूच माझा बाप
गुरु तूच माझी आई
तुझ्या कृपेचा किंकर
नाही कष्ट नाही व्यथा
वेदा नाही रे जमली
तुझ्या कीर्तीची रे गाथा
तूच मूर्तीमंत वेद
तूच अनादी अनंत
तूच माय सरस्वती
लंबोदर एकदंत
भावभक्तीने पूजन
वंदू तुझे पाय आता
पुष्पे अर्पण करोनी
व्यक्त माझी कृतज्ञता