कितीतरी दिवसांत
कितीतरी दिवसांत
कितीतरी दिवसांत
नक्षत्रांच्या गावी आले
शब्द तारका भेटता
लख्ख चांदण्यात न्हाले
शब्द नुपूरांचा कानी
नाद येथे रुणझुणं
लेखणीच्या कंकणांची
ऐकू येई किणकिणं
शब्द उमलूनी येथे
मळा साहित्याचा फुले
नक्षत्राच्या वेलीवरी
काव्य बहरुनी डुले..
शब्द कळस सुंदर
भव्य लालित्य मंदिरा
काव्यदिपे उजळतो
नित नक्षत्र गाभारा
अशी प्रतिभेची खाण
दिव्य नक्षत्र नगरी
गच्च भरताती इथे
गोड शब्दांच्या घागरी
झाले कावरी बावरी
काही मजला कळेना
भासे गगन ठेंगणे
हर्ष पोटात मावेना..
कितीतरी दिवसात
फुल पाखरु जाहले
प्राणप्रिय शब्दांसवे
मन मुग्ध बागडले..
