सावळी
सावळी
सावळेसे रंगभान मिरवत भाळी
रात्र येते अंधाराच्या गिरवत ओळी
सूर्य जातो नभाआड उजेडा घेऊन
शुभ्र दिवसाची आस रात्रीला देऊन
आकाशात उजळती चांदण्याचे दिवे
झिरमिर लक्ष लक्ष नक्षत्रांच्या सवे
भुईवर निळाईचे पसरते रान
रस्त्यालाही भूलवते मलमली जाण
डोंगराच्या स्वप्नी येते नदी एक धुंद
सोवळ्या धुक्याचा होतो श्वास श्वास मंद
दरीतून नाजुकशी सळसळ झुले
मातीवर थेंबओली नक्षी रोज फुले
नखलून शांततेला वारा दूर उडे
पाखरांच्या अंगाईत अलगद बुडे
मोहरला चंद्र जाई अंगणात कुण्या
खिडकीत चढाओढी आठवांच्या जुन्या
उतू जाते क्षितिजाची माया किर्रवेळी
किनाऱ्याची भरतीने भिजवते झोळी
सुख पाण्यातले जाते नभापार पुन्हा
थेंबातून ऋतू देई जपलेल्या खुणा
जशी येते चराचरी...माझ्यातही येते
रात्र तुझी देहामध्ये मालकंस गाते
ठसा उमटतो तुझा पहाटेच्या पाठी
रात्र देते दिवसाला व्याकुळल्या भेटी
