तू गेल्यावर
तू गेल्यावर
तू गेल्यावर आले नाही
कुणी मनाच्या अंगणदारी
प्राजक्ताच्या गंधफुलांची
अपूर्ण आता केशरवारी
तू गेल्यावर लपून बसली
काळोखाच्या खोल कपारी
एक कविता तुझी नि माझी
आठवातल्या लख्ख दुपारी
तू गेल्यावर सांज विसरली
क्षितिजावरचे येणे जाणे
समुद्र रुसला पुन्हा नदीवर
कुठले आता साजणगाणे
तू गेल्यावर बघत राहिले
रातराणिच्या खिडकीमधुनी
आणि भाबड्या चांदणरात्री
झुलत राहिले झुळकीमधुनी
तू गेल्यावर उतरुन आले
डोळ्यामधले आदिम पाणी
युग पांघरल्या ऊन सावल्या
सांगुन गेल्या जुनी कहाणी
तू गेल्यावर कळले नाही
मी आहे की? मी ही नाही?
बिलगुन बसले दुःख कोणते
माहित नाही... माहित नाही
