STORYMIRROR

pooja thube

Comedy

3  

pooja thube

Comedy

खवय्येगिरी

खवय्येगिरी

2 mins
719

बंडूच्या घरी एकदा जमली पंगत 

चमचमीत पदार्थांनी आली रंगत

सारे पदार्थ जमू लागले 

गुणगान अभिमानाने गाऊ लागले 

कोकणहून आले मासे नि भात

प्रेमाने करू लागले ते बात 

"रोमारोमांत आमुच्या कोकणचा स्वाद 

खाऊन तर पहा देताल तुम्ही दाद"

मुंबईचा वडापाव मिरवत आला

पावामध्ये वडा विसावत बोलला

"माझी तर लज्जतच न्यारी 

उपाशी जीवांना आधार करी"

कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा

बोलण्यात मागे राहीलच कसा

"मर्द मराठा रांगडा मी 

झणझणीत चवीची देतो हमी"

साताऱ्याचा कंदी पेढा डौलत आला 

वाटीत बसून सांगू लागला

"शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप

आनंदप्रसंगी मला मान, चवीला नाही मोजमाप"

पुण्याची मिसळ बाकरवडीला घेऊन आली

पुणेरी शैलीत सांगू लागली 

"थाट आमचा पेशवाई, चवीला नाही तोड

झणका लागेल ऐसा, काढाल जर खोड"

नाशिकचा चिवडा बिऱ्हाड घेऊन आला 

गडबड पाहून म्हणून लागला

"आहे मी नाशिकचा चिवडा प्रसिद्ध

चाखून तर बघा होऊन जाल धुंद"

खानदेशी भरीत शेवभाजीसोबत आले

भाकरीजवळ बसून बोलू लागले

"चुलीवरचा आमचा स्वाद न्यारा

चवीढवीचा असे खेळ सारा "

सोलापूरचे धपाटे चटणीला घेऊन आले

ताटात विराजमान होऊन म्हणाले

"पंढरीच्या राजाला करतो प्रणाम

चव आमची भारी, ठोका सलाम"

नागपूरची संत्राबर्फी नाचतच आली

घाम पुसत म्हणू लागली

"अधिवेशनातही मला असे भाव

आंबटगोड चव माझी, संत्राबर्फी नाव"

स्तुती साऱ्यांची ऐकून पाणी सुटले तोंडाला

हे खावे की ते धीर धरवेना बंड्याला

एक एक पदार्थ येऊ लागला ताटात

फस्त करून सारे जागा न उरली पोटात

अशी ही समृद्ध खाद्यसंस्कृती, थोर महाराष्ट्र माझा

 देऊनी तृप्तीचा ढेकर घेते मी रजा!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy