खेडं
खेडं
दाणे टिपणारा पक्षांचा थवा,
हिवाळ्यात न दिसे शेतावर
विषारी औषधांचा मारा
केला असतो पिकांवर।।
न राहिला ओढा नाला
गाई म्हशी डुंबण्याला
अतिक्रमण अन मोटर पंपाने
केंव्हाच कोरडा केला।।
प्रचंड पाणीटंचाई अन
शासनावरच पूर्ण भिस्त
सिंचनास न मिळे पाणी
हतबल शेतकरी उदास अन त्रस्त।।
न मिळे गुणवत्तापूर्ण शिक्षण
न मिळे चांगली नोकरी
जरी मिळविती डिग्री
करी तरुण रोजंदारी।।
ना धड शिक्षित
ना कष्ट करी
मोबाईलमध्ये डोकं
तंबाकू मळी पारावरी।।
विभक्त कुटूंबे झाली
झाले शेतीचे तुकडे
देती शेती सोडून
वळे तरुण शहराकडे।।
पुढारी निवडणुकीपूरता
करिती वापर तरुणांचा
संपता काम त्यांचे
तू कोण,तू कोणाचा?।।
ग्रामपंचायतीची निवडणूक
म्हणजे भांडणाचा कहर
गटागटात हाणामाऱ्या
विरोधकांशी धरती वैर।।
भागविण्या गरजा
शेतकरी काढी कर्ज अपार
फेडण्यास असमर्थ
करी आत्महत्येचा विचार।।
