चालसी दुरून तू
चालसी दुरून तू
काय आज जाहले, चालसी दुरून तू
वाटले मलाच की, पाहिले वळून तू
जे मुखी तुझ्या अता, भाव ते नव्हे खरे
हासतेस का अशी, आसवे गिळून तू
शब्द शब्द काव्य जे, वाहिले प्रिये तुला
खूण ती जुनी गडे, टाकली पुसून तू
आगळीक काय ती, काय जाहला गुन्हा
भूल सांग काय मज, का अशी रुसून तू
एकट्यास वाट ही, पार व्हायची कशी
चालतेस का तरी, अंतरी झरून तू
दुःख ना मला कदा, दूर आज तू जरी
आजही मनात या राहिली भरून तू
हर्ष सांगतो तुला, भाव हा मनातला
भेट शेवटी पुन्हा, एकदा हसून तू
