कधी येशील...(पाऊस)
कधी येशील...(पाऊस)
कधी येशील
काळ्या ढगातून
झिम्माड सरीसोबत
गर्जत आवाज करत
विजांचा कडकडाटाचे
ढोल ताशे वाजवत.
ये आतातरी बरसून जा
या व्याकुळल्या जीवांची
काहिली थांबवून जा
धरेच्या भेगाळल्या जागा
उरातल्या कळा
दूर सारून जा
भरून त्या
अतीव गरम उष्णतेच्या.
लाटांना थंड गार
सरींनी शांत, शांत तृप्त करून जा
काळ्या मेघा आकाशातून
झर झरत बरसून जा.
अरे ...तुझी वाट सारेच बघतात
काळी भेगाळली जमीनच नाही
केवळ तुझ्या थेंबासाठी
थांबलेला चातकच नाही
काळी पेरणारा बळीराजा
तर असतोचडोळे लावून
आकाशाकडे
अजून या वर्षीच
नवीन रेनकोट घेतलेली छोटी रीना
अगदी रस्त्यावर
छोट्या छत्रीत बसलेला बाबू चप्पलवाला
रोज मंदिराबाहेर उन्हात बसलेला भिकारी
घाम पुसत चाललेला भाजीवाला
गाडी ओढत चालणारा फेरीवाला
कुणी वाटसरू, मुल बाळं
अजून कोणकोण सर्वांचीच
जीवाची काहिली झालीय रे
तहानलेला कावळा..
खोप्यातली चिऊताई..
खुपच तहानलेली
दाणा चोचीत दूरवरून येतो
पण पाण्याचा थेंब?
पिलांपर्यंत जाताजाता आटत जातो रे.
भेगा सांभाळताना छातीवर
जमिनीचा उर फाटत जातो रे
आकाशातला सूर्य त्याचं काम करतो.
रोज न चुकता येतो आणि
खूप वेळ गरमी ठेवतो तेवत.
अगदी नकोशी
सांजेला हवा पण.
तीचं काम चोख करते
अर्ध्या रात्री का होईना
थोडी थंडी पसरवते.
मग तूच का लावतोस विलंब
दर वर्षीच झालं आता हे तुझं
का असा बदललास तू
येण्याची वाट वाट
पाहायला लावतोस...
का का....मेघा कधी रे
बरसशील झिम्माड...
झम झम करत बरस बाबा
आता जीव अगदी कोळून गेला
झाड झुडूप पाला वाळून गेला
आता बरस बाबा ...
सर्वांसाठी तरी बरस रे मेघा...
लवकर बरसून जा....
तरसलेली मने जिंकून जा!
