जीवन
जीवन
कधी रात्र असते, दमलेल्या जीवाला श्रमपरिहार
कधी रात्र असते, निराशेने केलेला प्रहार
कधी रात्र असते, आसुसलेल्या देहाला
रोमांचित करून, तनू फुलवणारी
मादक बहार
तर कधी रात्र असते, न संपणारा
विरहाचा अंधार.
तर अशा या रात्री......
कोणी पहातात उद्याची स्वप्नं
कोणी पहातात पहाटेची वाट
रात्र कशीही असली तरी
त्यानंतर येणारी पहाट
दाखवते सर्वांनाच प्रकाशाची वाट
घेऊन उत्साह आणि आनंदाचा विचार
पहाट करते सार्या विश्वामध्ये संचार
आणि होते प्रकाशमय सकाळ
सकाळ म्हणजे...............
आनंदमयी सुमधूर वातावरणाचा प्रारंभ
पुढील प्रत्येक क्षणाशी अनभिज्ञ
सूर्याची कोवळी किरणं पांघरुन
उमलणा-या कळ्यांशी हितगूज करत
दिवसानं केलेली सुरवात
असंच आपलं आयुष्यही.....
बालपण म्हणजे सकाळ,.
निष्पाप, निरागस कोवळ्या स्पर्शाचा
बोबड्या बोलांचा, दूडदूडणा-या पावलांचा
ममतेच्या वात्सल्य झर्यात
नहाण्याचा पवित्र काळ
चिऊ काउच्या गोष्टी ऐकत,
चिमुकला घास घेतो,
तेव्हा ढगाआड लपलेला चांदोमामा देखील
पहायला येतो
त्याच्याकडे पहातच डोळ्यात आठवणी विरघळतात
नकळतच गालावर आसवं ओघळतात
घास अमृताचा ताटात अन्
बालपण जातं असच थाटामाटात.......
आता चाहूल लागते तारुण्याची
उमलू लागतात निष्पाप कळ्या
मन मोकळं हसताना
पडतात गालावर खळ्या
उमेद आणि उत्साह ओसंडून वहातो
तेव्हा अनेक स्वप्न आपण भरभरुन पाहतो
त्याच वेळी पडते अचानक
भीषण वास्तवाशी गाठ
अन् हरवलेल्या स्वप्नांच्या प्रवाहात वहाताना
आपण शोधू लागतो काठ
माध्यान्हीच्या प्रखरतेत होरपळताना
आपणही आठवतो सकाळच्या
कोवळ्या किरणांना
आणि मग सुरू होतो सामना प्रखर लाटांशी
निघतो प्रवासास गुजगोष्टी करत वाटांशी
प्रत्येक वाटे वर होतो मोठा संघर्ष
कधी सुखाचा तर कधी दुःखाचा उत्कर्ष
या प्रखरतेतही एखादी
वाऱ्याची झुळूक लावते माया
एखादा वृक्ष देतो छाया
अन् प्रफुल्लित होते काया
या रखरखीत जीवनाला
मिळतो आनंदाचा पाया
मग राहते इमारत उभी
भिडते सार्या सार्यांशी
झगडते वादळवाऱ्याशी
कुणी मिळालेल्या छायेकडे
कृतज्ञतेने पाहतो
तर कुणी त्याच छायेच्या
मायेमध्ये वहातो
हवा हवासा वाटणारा हा विसावा
प्रत्येकालाच वाटत कुठेतरी असावा
निर्जन वाळवंटात
तहानलेल्याला दिसावा झरा
तसाच तेव्हा समजू लागतो
जीवनाचा अर्थ खरा
अन् होते आयुष्याची संध्याकाळ
या संध्याकाळी.......
कुणाची ओंजळ असते रिकामी तर
कुणाची असते भरलेली
भरलेली नसली तरी रिकामीही नसावी
यासाठीच जगताना प्रत्येकाची धडपड चाललेली.
