जीवन फुलांचे
जीवन फुलांचे


फुलं हसतात
अन् दडून जातात
काळाच्या ओघात!
अन् शेवटी उरतात
विस्कटलेल्या पाकळ्या
सुगंधाला कवटाळत...
कधी तुडवली जातात
दुष्टाच्या पायदळीत!
अन् होतात जमिनदोस्त
अगतिकता स्विकारत....
कधी देवाच्या गळ्यात
तर कधी स्त्रीच्या जुड्यात
सजवत असतात शृंगाराला
प्रितीचा सुवास दरवळत....
कधी निसर्गाला वेडावतात
वाऱ्यासंगे बेधुंद डुलत
तर कधी शोकग्रस्त होतात
मृतात्म्याची सद्गत करीत....
कधी सोहळे सजवितात
आकर्षणे दर्शवित तन्मयतेने
तर कधी शोक व्यक्त करतात
तेवढ्याच निरागसतेने.....
कोमेजल्यावरही देतात
अत्तर होऊन सुवासिकता
अंतिम बलिदान देत!!!