जगावे कुठे वाटते...
जगावे कुठे वाटते...
जगावे कुठे वाटते एकटीला
हसावे कुठे वाटते एकटीला
ऋतू साद घाली जरी पावसाचा
भिजावे कुठे वाटते एकटीला
मिटून पाकळीपाकळी ठेवते मी
फुलावे कुठे वाटते एकटीला
दिवा दूर तेथे झुरे वात येथे
जळावे कुठे वाटते एकटीला
जरी राग येतो तुझ्या वागण्याचा
रुसावे कुठे वाटते एकटीला
किती आवडे गीत गाया परंतु
म्हणावे कुठे वाटते एकटीला