बाप माझा....
बाप माझा....
आहे उभ्या घराचा आधार बाप माझा!
देवा तुझाच वाटे अवतार बाप माझा!
हासून संकटांना देतोय तोंड सार्या
मी पाहिला न केव्हा बेजार बाप माझा!
झिजवून देह त्याचा पंखास बळ दिले या
देतोय जीवनाला आकार बाप माझा!
सजली कितीक स्वप्ने डोळ्यात या घराच्या
करतो झटून त्यांना साकार बाप माझा!
येवो किती नव्याने ही वादळे घराशी
पण मानणार नाही बघ हार बाप माझा!
शाबूत मनगटाचे बळ ठेवले तयाने
झाला कुणापुढे ना लाचार बाप माझा!
वरवर कठोर दिसतो फणसापरी जरी तो
हळवा तसा मनाचा रे फार बाप माझा!
जपली अजून माझी भातूकली तिथे अन
जपतो इथे सुखाचा संसार बाप माझा!
पडतील शब्द अधुरे त्याच्यावरी लिहाया
शब्दात काय मांडू दिलदार बाप माझा!
