ना रंगले रंगात कुठल्या....
ना रंगले रंगात कुठल्या....
ना रंगले रंगात कुठल्या सावळ्या रंगाविना!
मिटला कुठे तो रंग अन मिटल्या कुठे अजुनी खुणा!
विसरूनिया साऱ्या जगाला भेटते जेव्हा तुला
सांगू कसे कृष्णा किती सुख लाभते तेव्हा मला!
मी राधिका मीरा तुझी, मी सत्यभामा रुक्मिणी
तू फक्त आहे एक माझा ना जगी दुसरा कुणी!
तू छेडता ही बासरी मी बावरी होते किती?
हातात घेता हात तू मी लाजरी होते किती?
सहवास होता दो घडीचा लाभला कान्हा जरी
होता खरा तो क्षण सुखाचा वाटला मजला तरी!
का वेड मजला लावले,का ओढ जीवा लावली?
तू दूर जाता सावळ्या ही लोचने ओलावली!
बेरंग झाली जिंदगी अवघी तुझ्यावाचून रे
ये,एकदा परतून तू अन हाल जा पाहून रे!
पिवळा नि हिरवा,तांबडा ना रंग कुठला भावतो
रंगात साऱ्या वेगळा मज शामरंगच भासतो!
