जळते दिव्यातली ती....
जळते दिव्यातली ती....
1 min
384
जळते दिव्यातली ती होवून वात आई
अन दाटल्या तमावर करतेच मात आई
मज ठेच लागली की व्याकूळ तीच होते
पाहून दुःख माझे दाटे उरात आई
पिल्लास वेदना या होता उदास होते
जेव्हा सुखात आम्ही तेव्हा सुखात आई
झाले अमीर मीही उरली न हाव कसली
लाजे कुबेर मजला आहे घरात आई
येते कुठून हे बळ अंगी तुझ्या कळेना
तू पार संकटांना करते क्षणात आई
ती आसपास माझ्या एकेक श्वास माझा
देहात तीच आहे, आहे मनात आई
का पोरके कुणाला करतोस ईश्वरा तू
सर्वास तू दिसू दे कायम जगात आई
ना मंदिरात कुठल्या,ना देवळात आहे
आईत देव आहे देवा तुझ्यात आई
