बाई....
बाई....
1 min
449
आहे किती तुझा हा अवघड प्रवास बाई
काचाच तुडविण्याचा वेडा प्रयास बाई
रात्रीस एकटीने तू ढाळतेस आसू
लपवून वेदनांना लोकात हास बाई
तू मायबाप होते, होते कधी गुरू तू
आकार जीवनाला देतेस खास बाई
हासून घात होतो तू वाच माणसांना
जो तो टिपून बसला घेण्यास घास बाई
पुजती पहा तुला ते घालून पुष्पमाळा
दो-यात गुंफलेला आहेच फास बाई
ह्या कोवळ्या कळ्यांना सांभाळ तू जराशी
फिरतात लाख भुंगे हे आसपास बाई
अवघीच जिंदगी ही जाळून टाकली तू
केव्हा तुझा सुखाचा येईन मास बाई?
दुनियेस का कळेना ते मोल माउलीचे
जगण्यास तू जगाच्या देतेस श्वास बाई
