इसवी सन २०७५ (मुक्तछंद)
इसवी सन २०७५ (मुक्तछंद)
इसवी सन २०७५
माझा नातू
शैक्षणिक पात्रातांचे जंगल तुडवीत
पोहचलाय बापजाद्याच्या
लांबीरुंदी गमावलेल्या
टीचभर जमिनीच्या तुकड्याच्या बांधावर
आणि
करू लागलाय विचार
उंचीच्या विस्ताराचा...
अनेक मजली मातीच्या थरांतून तो
उगवू पाहतोय
फळभाज्या,पालेभाज्या आणि काही फुले
संकरलेली...
बांधावरचे वडाचे झाड
सलले त्याच्या डोळ्यांत
वठलेल्या खोडासारखे...
इंटरनेट आणि नव्या तंत्राची जोड
प्रिय होतेय त्याला हृदयाच्या ठोक्यांइतकीच
यंत्रांची धडधड...
उगवू पाहणाऱ्या प्रत्येक कोंबाच्या तळाशी तो
गुंतवीत जातो
अर्थशास्रातील सिद्धांत
आणि पोटाभोवती फिरणारी सृष्टी
साक्षात लोळण घेतेय त्याच्या पायाशी
उत्पादनाची जुळवीत गणिते...
आपत्य प्राप्तीचा विषय त्याने
बाजूलाच ठेवलेला दिसतो
पत्नीच्या संमतीने...
नाही म्हटल्यास
राहायला जागा केलीय त्याने
चौथ्या की पाचव्या मजल्यावर
फूलशेतीच्या शेजारी इशान्य कोपऱ्यात
जेथे उपलब्ध होतेय त्याला
उत्तम नेटवर्क
आणि स्वत:पुरती वीजही...
मात्र
तेथे मला
बाप काही दिसत नाही त्याचा
चष्म्याच्या जाड भिंगातूनही...
ओळखतही नाही त्याला
तळमजल्यात पाळलेली गाय
ती असते आसूसलेली
कासेला भिडणाऱ्या यंत्राच्या प्रेमळ स्पर्शासाठी...
वासरूही नाकारेल ती
थोड्याच दिवसांत
कदाचित