बदी करतो मातीत...
बदी करतो मातीत...
1 min
265
ऊन घेत अंगावर
जरा बदलता हवा
बदी करतो मातीत
रान चिमण्यांचा थवा...
त्याच थव्यातील एक
माझी सोबतीन झाली
रोज अंगणी येऊन
चिवचिव साद घाली...
तिचे येणे नाजूकसे
माझे आभाळते वय
पंख भरारते तिचे
माझे मखमली पाय...
झाड शेजारचे मोठे
आम्हा दोघींचा आधार
माझ्या शेजारी घराच्या
तिचे इवलेसे घर...
खेळण्याला तिच्यासंगे
मी गं शोधिते बहाणा
मन आभाळी जपते
तिच्या चाहुलीच्या खुणा...
दाणे भरता कणीस
पाने वाजवती टाळ्या
माझे वाचवण्या पीक
चोच तिची वेची अळ्या...