हुंडाबळी
हुंडाबळी
हुंड्यापायी जीवन सरले
अधुरी स्वप्नकहाणी,
अर्ध्यावरती डाव मोडता
झाले केविलवाणी।
काय तिथे ते कमीच होते
सांगा माझ्यात?
परी आभागिनी कमनशिबी मी
होते गरिबीत मजेत।
तिकडिल बसले बोलुनी माझ्या
भोळ्या जनकाशी
सुन शोभते सुरम्य सुंदर
आम्हा न च कर्तव्य त्या द्रव्याशी!
भोळा सांब तो तिथेच फसला
भुलूनी गेला ऐश्वर्याला
गोड बोलूनी ह्यांनी वरले
आणि दासी बणविली ही बाला।
अल्लड ते ही वय हो होते
जवानीतले धुंद
न च कळला तो मनास माझ्या
इकडचा खराखुरा रंग।
कसाबसा मग एक मास तो
उलटुनी हो गेला
आणि जाहली सुरुवातच ती
माझ्या जाचाला!
कधी सासुने निष्ठुर वचने
मजला ताडावे
वा नंदेने उलथनेच ते
फेकुनी मारावे।
हळुच एकदिन धनी कुंकवाचा
मलाच हो वदला,
बापाकडुनी रुपये लक्ष ते
घेऊनी ये मजला।
हुंड्याविन ते लग्न करोनी
पुरती फसगत झाली
हिरोहोंडाची इच्छा माझी
अपुरीच राहिली।
असे वदूत मग नराधमाने
खुशाल मज ताडावे
अन्नावाचुनी सासुमाॅने
उपाशी कि ठेवावे।
असेच घडता बहुतदिन मी
व्याकुळ मनी झाले,
परी धन ते आणण्या माहेरातुनी
असमर्थ हो ठरले।
गळ्यात माझ्या त्या दुष्टाने
कृष्णमणी बांधिले,
जन्मोजन्मीची सासुरवासीन मी
त्याच्यामुळे झाले!
जीवन जगणे असह्य होता
केला मी निर्धार!
तुडुंब भरल्या विहिरीत आता
झोकुन मी देणार!