मैत्री की प्रेम
मैत्री की प्रेम


गोड मैत्री जुळली
अन् सुरेल सुर जुळला
आयुष्य बहरले
हाच मैत्रीचा कळवळा
भय न लागे कसले
आनंदाला ना पारावार
तूच माझा सखा सोबती
जगाला ओरडून सांगणार
मित्र भेटतील विविध
आयुष्य तुझ्या नावे केले
लेखणीने माझे मला
अस्थित्व बहाल केले
माझ्यात विलीन झाले
तरी नकळत मन हे बावरले
मैत्रीत तुझ्या सख्या
मन माझे नाही सावरले
सोबत चालत असताना
बांध विचारांना घातला होता
तुझाच विचार करताना
भावनांचा बांध फुटला होता....
प्रश्न कायमचा मिटला नसता
इच्छा कायमची संपली नसते
जीवनाच्या सुंदर वाटेवर
प्रेमाने फुंकर मारायची असते
प्रेम व विश्वासावर
नाते खरे जुळले
कितीही थांबवले तरी
आपोआप तुझ्याच कडे वळले
बहरून स्वतःच
रोज पाहते मी दर्पण
तुझ्या नि माझ्या मैत्रीत
करते प्राणही अर्पण
सांगू सख्या तुजला
तुझ्यात जीव गुंतला
स्वप्नाच्या फांदीवर
मात्र विरहाने जीव पीडला
प्रतिबिंब दिसता तुझे
पुन्हा तुझ्याच प्रेमात पडले
रुप पाहून लोचनी
पुढील आयुष्य हि तुझ्या नावे केले
सारे काही बहाल नको सख्या
फक्त अनमोल भेट हवी तुझी
कवेत घे बिलगून मजला
हीच शेवटची इच्छा माझी
एकांतात धरलेल्या हाताला
चंद्राची आहे साक्ष
पुनर्जन्म घेऊ सख्या
नकोय मला मोक्ष
असा सारखा बोलू नको
मनाला दुखवू नको
आयुष्य माझे तूच ना रे
हे जरा विसरु नको
शब्दात न सांगता प्रेम ओळखावे
असे नाते आपणच घट्ट करावे
नकळत सांज सायंकाळी
मन माझे तुलाच का बीलागावें
मैत्री आहे कि प्रेम
तुच माझा सरताज
वचन दिले तुला रे
जिवापाड जपेन हा साज
आयुष्य मोहक झाले
असा कसा रूपाला भाळला
प्रेम पुन्हा नव्याने झाले
एकांतात हात का धरला
मन झुरते म्हणून तर
प्रेम जुळले आहे हे
काळीज माझं तुझच सख्या
कधी पासूनच आहे
अबोल तू अबोल मी
अबोल ही आपली प्रीत
आयुष्य फक्त तुझच आहे
आनंदाचे हे मधूर प्रेमगीत
कशी विसरू सख्या तुला
तूच तर माझी शान आहेस
मैत्री म्हणू की प्रेम
तेवढीच काय मी अजाण.....
तेवढीच काय मी अजाण.....