हर्ष गीत हे...
हर्ष गीत हे...
माझे माझे सर्व म्हणावे हर्ष गीत गावे
उधळीत जावे प्रेम जगावर मीपण विसरावे...
पाऊस पक्षी, ओली नक्षी रेखिती अमृत धारा
ओले शिरवे प्रेम नभाचे पांघरूण घ्यावे...१.
चंद्र रुपेरी, हसे अंबरी रोज नवी ये रात
काळोखासह दुधी चांदणे पिवून धुंद व्हावे..२.
कधी पेटतो वणवा चित्ती, केव्हा हिम वृष्टी
उधाणलेल्या मनास केव्हा वादळ भेटावे..३.
सुख-दु:खाचे वेचीत मोती असेच जावे पुढे
प्रेमासाठी प्रेम देऊनी प्रेमची मिळवावे..४.
अनुभूतीच्या रम्य पखरणी ओंजळीत घ्याव्या
फुलासारखे क्षणात ते सारे चुंबूनिया घ्यावे..५.
येईल मृत्यू खुशाल येवो, मला न त्याची क्षिती
सोडून सारे गात गीत हे, त्याला कवळावे...६.