हरी आणि हारी
हरी आणि हारी
उडीद मुगाच्या हारी, हारी पेरल्या तुरी
तुरी पैशाच्या सरी, सरी वेचल्या हरी।
हरी जगण्याच्या हारी, बोलां हरी हरी।।धृ।।
हळद, ऊस शिवारी, केळी पपयाची माढी
माढी सुखाची अंबरी, अंबरी बसतो हरी।
हरी जगण्याच्या हारी, बोलां हरी हरी।।१।।
ज्वारी, भड वारकरी, टिपरी खेळे बाजरी
बाजरी, साळू फुगडी, फुगडी दंगतो हरी।
हरी जगण्याच्या हारी, बोलां हरी हरी।।२।।
तीळ, जवसाची भारी, दोन हाती वाजे टाळी
टाळी ब्रम्हांनंद सरी, सरी सुखावतो हरी।
हरी जगण्याचा हारी, बोला हरी हरी।।३।।
लसूण आलं गाजरं, गाजरं वटाणे वालं
वाल, वांगी, कांदे, पात, पात निंदतो हरी।
हरी जगण्याचा हारी, बोला हरी हरी।।४।।
मेथी पालकाची जुडी, जुडी भाजी हिरवी
हिरवी संभार मिरची, मिरची खुडतो हरी।
हरी जगण्याचा हारी, बोला हरी हरी।।५।।
हळद मसाला न्यारी, न्यारी सजते न्याहरी
न्याहरी चोपतो हरी, हरी जगतो हरी।
हरी जगण्याचा हारी, बोला हरी हरी।।६।।
