गृह सम्राज्ञी
गृह सम्राज्ञी
बऱ्याच वेळा कुणी तुला विचारते
"काय करता आपण?"
तू सहजच उच्चारतेस
" अ... काहीच नाही, मी गृहिणी आहे."
तुझ्या या उत्तराचा मी विचार केला
जर.... काहीच न करता तू
गृहिणी, गृह सम्राज्ञी आहेस
तर, जेव्हा तू काही करशील
तेव्हा तू काय असशील?
देशाची सम्राज्ञी! वा जगाची सम्राज्ञी!
खरंतर! "काहीच नाही"
हे तुझे नकारात्मक वाक्य
मला जरा बोचलच,
जर, दिवसभराच्या १८/१९ तासांचा
तुझ्या कामाची लिस्ट केली
तर कदाचित तू केलेल्या
कामांचा तो अपमान असेल
खरंतर, ती भलीमोठी लिस्ट,
पुर्ण ही होणार नाही
कदाचित संपणार ही नाही.
मग एवढं करूनही
काहीच नाही म्हणणारी तू
पहिल्यांदा तूला सलाम!
दुसरे असे की अजून या
व्यतिरीक्त ही काही करण्याची
तूझी इच्छा वा जिद्द
या पुढे मी नतमस्तक होते.
तू किती आणि काय करतेस
याचा हिशोब जगासमोर मांडणे
खरंतर हाच मुर्खपणा मी समजते
किती तरी भुमिका, नाती
दिवसभरात तुझ्या बदलतात
प्रत्येकात तू पाण्याप्रमाणे सामावतेसं
ती भुमिका, नाती निभावतेस
स्वतःच्या परीवारासाठी वाहून घेतेस
तरी तू काहीच करत नाहीस
हे जरा बोचतेच
तूझ्या वाक्यातला 'मी' जरा
उगाळावासा वाटतो, या सगळ्यात
तो कधी, कुठे असतो?
तुझ्यात तो कधी भासतो?
मला नेहमी वाटते ग!
तुझ्यातला 'मी' जर बहरून आला तर,
तुला तुझ्या कामाचा आवाका समजेल
मग तू स्वतःला कधीच
कमी लेखणार नाहीस
अभिमानाने म्हणशील
"मी गृहिणी आहे.
हो! गृह सम्राज्ञी आहे."
