गोड पाहुणी
गोड पाहुणी
आली आली माहेरवाशीण
माहेरात सुख घेण्यास,
सासरचा थकवा सोडून
आई बाबास भेटण्यास..!!१!!
गोड-धोड बनवून
सासरी केली दिवाळी,
माहेरची ओढ लागताच
निघाली स्वारी सकाळी..!!२!!
ओझे जबाबदारीचे
हळूच गेली विसरून,
पाहताच मायेचा दार
डोळे आले भरून..!!३!!
गळाभेट घेताच आईची
अश्रू ओघळले गालावर,
लेक परतली घरट्यात
चार दिवसांच्या परतीवर..!!४!!
जरी असली माहेरवाशीण
गोड पाहुणी माहेरची,
भेटून माहेरच्या माणसांना
परत ओढ लागली सासरची..!!५!!
