गावपन माझे हरवले
गावपन माझे हरवले
कोंबडयाचे आरवणे
गायी वासराचे हंबरणे
गोठयातील शेण काढणे
गावपण माझे हरवले.
चुलीला राखेचे पोतेरे
भींतीत काच लिपणे
सडा आणि सारवणे
गावपण माझे हरवले.
चुलीसाठी इंगळ मागणे
शेतात रोडगे भाजणे
तव्यावर मिरच्या ठेचणे
गावपण माझे हरवले.
मुऱ्हाळ्याची वाट पाहणे
अख्ख्या गावाचे वाटी लावणे
लेक बळीची वटी भरणे
गावपण माझे हरवले.
पारावर गप्पा मारणे
चांदण्यात खेळ खेळणे
कुत्र भुंकता जागी होणे
गावपण माझे हरवले.
शेतातच न्याहरी अन् जेवणे
माळव कच्चे सोबती खाणे
तांब्याभर पाणी ढेकर देणे
गावपण माझे हरवले.
घरा घरात राजकारण येणे
सात बाऱ्यावर नाव घेणे
लेक बापात न राहणे
गावपण माझे हरवले.
कसे फेरले वासे प्रगतीचे
केले स्वतः यंत्र मानवाने
पाहूण हे मन आक्रंदणे
गावपण माझे हरवले.
