एक अनुभव... 'आईपणाचा'.
एक अनुभव... 'आईपणाचा'.
एक अनुभव आईपणाचा
आमरण कळा सोसण्याचा
वेदनांच्या कुशीतून एक
निरागस कळी उमलण्याचा
कळीचे असणे, कळीचे जगणे
मनोमन अनुभवते मी
तुझे माझ्यात सामावणे
आनंदे जगते मी
चाहूल तुझी हळुवार ही
लागते जेव्हा मला
वेदनेच्या सप्तस्वरांत आज
एक गंधार उमलला
तूच आहेस अस्तित्व माझे
अन् तूच माझी एक आशा
तुझ्या माझ्यातले दुवे हे
देती जीवना नवी दिशा
सोबतीने चालतानाही
कशास बाळगू व्यर्थ भीती?
माझे 'मी'पण देऊन तुला
ओंजळ माझी होईल रिती
एक जीव हा ऊजवण्याचा
अनुभव एक रुजवण्याचा
रुजवात ही करता करता
आयुष्य समृद्ध करण्याचा
विचारांचे लेणे आता
नवा अर्थ आकळेल
तुझे माझ्यातले रुजणे
माझे संचितच ठरेल
हेच माझे संचित आता
आजन्म असेच जपेन मी
तुला कुशीत घेता घेता
पुन्हा 'आईपण' जगेन मी
होऊ कशी उतराई बाळा
तू तर जन्म मजला दिला
आईपणाचा 'सोहळा' हा
देई मज मातृत्व 'जिव्हाळा'
मातृत्वाचे दान हे जेव्हा
खरा 'जन्म' आकळते
तुजपरी कृतज्ञ राहून मी
एक 'आईपण' अनुभवते.
