दिवस तव भासाचा
दिवस तव भासाचा


शांत रम्य या पहाटे, आज मनी तव आठव दाटे।
उडून गेल्या त्या क्षणांत आज पुन्हा मज जावे वाटे।।
गोधडीतही आज मजला, मखमली तव स्पर्श भासे।
भासातल्या या कवेत तुझिया आज घेई मी उसासे।।
कवडसा तो अंगी पडता, अंग शहारून आले।
तव मिठीतील क्षण आठवता, मन माझे मोहरून गेले।।
कोवळ्या किरणांत आता का तुला मी उगाच शोधी।
का खुळ्या माझ्या मनानं पुनः लागावे तुझ्याच नादी?
माध्यान्हाच्या उन्हाने मग वास्तवाचा जन्म झाला।
घामाचाही थेंब मग तो, आज मम डोळ्यांतून आला।।
सांजवेळी न रडावे, होती आई मज सांगून गेली।
तत्क्षणीच मग शुष्क जाहली आसवे ती चिंब ओली।।
गर्द काली रात्र येता, मनानी का ही साद द्यावी?
रम्य भासली तरी नको ती पहाट पुन्हा मजला फसवी।।