बाबाची लाडकी
बाबाची लाडकी
आज लाडकीच लगीन माझ्या बाबानं आनंदानं म्हटलं
अन दुसऱ्याच क्षणी त्याच्या का डोळा पाणी दाटलं ?
तिचा गोड चेहरा पाहून त्याचा दिवस सुरु होई,
दिवसभराचा शीण सारा तिच्या हासूंत विरून जाई |
भूक पोटी नसली तरी बाबा चिऊसाठी जेवायचा,
कारण, तिचा शेवटला घास त्याच्याच ताटात सरायचा ।
सानुलीला झोपाया लागे बाबाच्याच हाताची उशी,
तिच्यावाचून उद्या बाबाला झोप तरी येणार कशी ?
बाबानं त्याच्या छकुलीला तळहाताच्या फोडावानी जपलंय,
तिच्या डोळा आलेलं पाणी, अलगद त्याच्या ओठांनी टिपलंय ।
बाबानं आज पुन्हा एकदा तिला मोठ्या प्रेमानं कुरवाळलं ,
कधी न रडलेल्या बाबानं आज डोळ्यातून पाणी गाळलं ।
बाबा इतकंच म्हणाला शेवटी, "सुखी राहा बाळा "
अन् माझ्याइतकाच लागो त्यांना माझ्या लेकराचा लळा ।