दिवाळी
दिवाळी
दिवा तेवतो अंगणी l
लख्ख झळाळी झळाळी ll
उजळल्या चहुदिशा l
सण आला हा दिवाळी llधृll
सण हर्ष आनंदाचा l
उत्सवं हा उल्हासाचा ll
आपुलकी जपण्याचा l
नात्यातल्या गोडव्याचा ll1ll
लाडू,चकली,चिवडा l
गोड फराळ फराळं ll
गंध सुवास सुवास l
सारीकडे दरवळं ll2ll
पीक डोलते शेतात l
धरणीही सुखावली ll
हास्य बळीराजा मुखी l
सण आनंदी दिवाळी ll3ll
वस्त्र रंगीत रंगीत l
हर्ष ख़ुशी पसरली ll
पाच दिसाच्या सणानं l
कळी सौख्याची खुलली ll4ll
वसुबारसेचा दिन l
गाय वासरास मान ll
छान आरोग्य वर्धना l
धन्वंतरीचं चिंतन ll5ll
देवता धनाची लक्ष्मी l
तिला करूया नमन ll
इडा पीडा टळो सारी l
म्हणून लक्ष्मी पुजन ll6ll
आला दिवाळी पाडवा l
छान रांगोळी अंगणी ll
भावा ओवाळी बहीण l
भाऊबीजेच्या या दिनी ll7ll
आला हर्ष उधळत l
सण सौख्याचा दिवाळी ll
देई मांगल्य प्रतीक l
फेडी अंधाराची जाळी ll8ll
