गंध दरवळे माती
गंध दरवळे माती
गंध दरवळे माती l
थेंब पावसाचे आले ll
धन्य झाली धरामाय l
मन तिचे आनंदले llधृll
मेघ काळेकाळे भोर l
कसे खेळती पळती ll
वारा वावधन वाहे l
त्यात विजेची भरती ll1ll
ढोल आभाळात वाजे l
वाजे वाऱ्याची पिपाणी ll
वरात आली पावसाची l
बघा नटली अवणी ll2ll
चैत्र वैशाखाचं ऊन l
धरा तप्त तहानली ll
थेंब वळिवाचे येता l
कशी सुखावुनं गेली ll3ll
सर बरसे जोमानं l
नाचे रानामंधी मोर ll
पिकं भिजलं शेतात l
जिवा बळीराजा घोर ll4ll
गारा पडल्या टपोऱ्या l
मना मोहून त्या गेल्या ll
लग्नात धरा पावसाच्या l
कुणी अक्षदा फेकल्या ll5ll
उन्ह कोवळं दाटता l
मेळ सप्तरंगी झाला ll
सोहळा सृष्टीचा पाहण्या l
रथ देवाजीचा आला ll6ll
तरुवेली स्तब्ध सारी l
पक्षी पावसात न्हाली ll
खण हिरवा लेवून l
आज धरीत्री हसली ll7ll